Sunday, November 29, 2015

कट्यार काळजात घुसली !!! ( आणि पार आरपार गेली !)



MPM२ वर लिहिताना म्हटल होता तसच आताही म्हणतेय....हे परीक्षण नाहीये....कारण ह्या चित्रपटाच परीक्षण करणे म्हणजे दारव्हेकर , वसंतराव आणि अभिषेकींच परीक्षण केल्यासारख वाटेल !
हा चित्रपट मी एकटीने जाऊन पाहिला – एकट्याने चित्रपट पाहण्यातही एक वेगळी मजा असते... तुम्ही अगदी मोकळेपणे येणाऱ्या अश्रुना वाट देता...कोण काय म्हणेल याचा विचार न करता .....

सुबोध भावेचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट ....आणि जुन्या संगीत नाटकांच पुनरुज्जीवन करण्याचा हा उपक्रम नक्कीच स्तुत्य ! नवीन पिढीला “ बद्तमीज दिल आणि मटरगशती “ च्या खेरीज इतरही संगीत अस्तित्वात आहे ह्याची जाणीव झाली . मराठी सिनेसृष्टीला चांगले दिवस आलेत ही समजूत अधिकच पक्की झाली .

हा चित्रपट खरं तर मी गेल्या आठवड्यातच पाहिला ....पण मी त्या अनुभवाला मनात रुजू देत होते जणू.....पाहताना अनेक वेळा डोळ्यातून अश्रू वाहू लागले....खरं तर प्रसंगांमुळे नाहीत तर संगीतामुळे....अंगावर रोमांचही उभे राहत होते अनेक वेळा ...सुरांची ताकदच आहे तेव्हढी ....
पहिल्या प्रेमाचा तो भर उतरल्यावर मी किंचित critical दृष्टीने आज पुन्हा त्या चित्रपटाकडे पाहण्याचा प्रयत्न केला ....तेव्हा मला जाणवले की संगीतच खरं आहे ह्यात...इतर काही फारस महत्वाच नाही...
मुळात हे नाटक लिहिले गेले तेच संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी , त्यामुळे ही कथा साधीशी असणार यात नवल नाही , ह्या नव्या रुपात चित्रपट चकचकीत आणि दिमाखदार दिसतो यात शंकाच नाही पण तरीही संगीत हेच मध्यवर्ती !

दोन संगीत घराण्यातल्या स्पर्धेची ही कथा – पंडित भानुशंकर आणि खांसाहेब यांची –कट्यार जिंकण्याच्या स्पर्धेची ...सतत १४ वर्ष खांसाहेब ही स्पर्धा हरतात . आणि १४ वर्ष त्यांच्यावर ( काहीसा) अन्याय होत राहतो ...आपल्या कानांना दोघांचही संगीत अगदी सारखंच प्रभावशाली वाटतं आणि राजेसाहेब कायम भानुशंकर यांना झुकतं माप देत आहेत अस वाटत राहत .१४ वर्ष उत्तम गाऊनही , स्पर्धेचे विजयीपद तर राहोच पण दोन वेळच्या खायचीही भ्रांत ! सतत अन्याय झाल्यावर कोणीही माणूस सुडाने पेटून उठतोच ( आपले हिंदी चित्रपट याचे सतत दाखले देतात !) पुढचा चित्रपट या सूडाचा प्रवास आणि शेवट दाखवतो....

खटकण्यासारखे अगदी थोडेसे – वेशभूषा काही ठिकाणी ( उमेची अमराठी साडी आणि भानुशंकर यांची मद्रासी पगडी ) तसाच झरिना मशिदीत जाऊन कशी काय कव्वाली ऐकते हा प्रश्न ...बर ऐकते तर ऐकते पण परदा न करता , परपुरुषासमोरही जाते हे थोडे खटकले.( भानुशंकर आणि विशेषतः उमा बिनदिक्कत मशिदीत जातात हेही नवीनच !)

शंकर महादेवन मुळात अभिनेता नाही त्यामुळे त्यांना कस लागेल असे प्रसंग देण्यात आले नाहीत . पण त्या व्यक्तिरेखेसाठी योग्यच ! सज्जन , ज्ञानीं आणि पट्टीचे गायक ते निश्चितच वाटतात. सचिनजीचा underplay केलेला खांसाहेब आणि त्यांच उर्दू झक्कास ! सुबोध भावे सदाशिव म्हणून चपखल ! ( गाताना मात्र दोघांचाही अभिनय किंचित  कृत्रिम  वाटतो )

Climax फार परिणामकारक विशेषतः तराणा ...अंगावर शहारे येतात आणि डोळ्यात पाणी! दुसरा आवडलेला scene काजव्यांचा ...कल्पक आणि उत्तम आकारलेला....देस रागातल “ मन मंदिरा “ अप्रतिम !...शिवम आणि शंकर महादेवन या पितापुत्रांनी गायलेल....संगीताची ताकद जाणवते ....गायकांचा बुलंद स्वर निळ्या आकाशाच्या घुमटावरून परावर्तीत होतो...आपल्या शरीरावर फुटलेल्या असंख्य कानांमधून आत शिरून  थेट आपल्या आत्म्याला भिडतो असा सतत जाणवत रहात.....

एकंदरीत गाणं ह्या चित्रपटाचा आत्मा आहे , गाण्याशिवाय हा चित्रपट शून्य आणि गाण्यामुळे हा चित्रपट लक्षणीय बनलाय . त्यामुळे आभार ....राहुल देशपांडे, महेश काळे आणि शंकर व शिवम महादेवन यांचे ! एक भव्य संगीतमय अनुभव !!  

Sunday, November 22, 2015

गोष्ट त्याची आणि तिची ....

मी आधीच स्पष्ट करते - हे परीक्षण नाहीये...फक्त काही विचार आहेत...चित्रपट पाहताना आलेले !

आज सतीश राजवाडेचा मुंबई-पुणे -मुंबई २ पाहण्याचा योग आला . ( हो , मी त्याला  ‘ राजवाडेचाअसाच म्हणणार , कारण मी राजवाडेची खूप मोठी  fan  (का काय म्हणतात ना  ती - )आहे  . असंभव मध्ये विक्रांत म्हणून तो फार आवडून गेलेला ….पानाच्या पान खरडलेली त्याच्यावर...जाऊ दे..ते पुन्हा कधीतरी ! )

तर MPM १ आवडला  होता...म्हणून हा बघायचा होता एवढा नक्की . MPM १ मुख्यतः दोन पात्रांची कथा - ज्यांची नावही आपल्याला समजत नाहीत - दोन्ही कलाकारांनी ती छान पेलली होती . अतिशय छान , चुरचुरीत म्हणता येतील असे संवाद - कथा नव्हती तरी त्या चित्रपटाला उद्देश निश्चितच होता .

आजचा भाग मात्र मला काहीसा निरुद्देश वाटला . पहिल्या भेटीत तिने लग्नाला होकार दिला हे ठीक - ( आता त्या दोघांचा गौतम वं गौरी म्हणून बारसं झालय बर का ! ) खरं तर तिने स्पष्ट होकार दिला नव्हता असा मला अंधुकस आठवतंय -(  तरी बर - दोघांनी एक पूर्ण दिवस एकामेकांच्या  संगतीत घालवला होता - नुसता CCD मध्ये दोन तास भेटले नव्हते - आमच्या वेळी अस नव्हत हो ! ) तरीही तिला ही घाई आहे अस वाटत राहत -( बर - वाटेना का ?) कर्मधर्मसंयोगाने त्याला दोन तीन वेळा भेटींची वेळ सांभाळता येत नाही , त्यावरून ही बया लग्न मोडायच ठरवते -मग उर्वरित चित्रपट - पुनश्च प्रियाराधन !  अगदी लग्नाचा दिवस येऊन ठेपतो तरीही हिचा निर्णय काही होत नाही - वाटत - हिला सांगाव - " बाई,  एक काय ते बोल - इस पार या उस पार ! "

आणि अधून मधून आपल्याला Tissot च घड्याळ , रेड label चहा आणि प्रभातच तूप  आणि इतर dairy उत्पादनं याबद्दल माहिती मिळत राहते – प्रेक्षक पाहतात म्हणून काहीही माथी मारा !

एवढा मात्र नक्की – कंटाळा येत नाही – चित्रपट भराभर पुढे सरकत राहतो . खरं तर हा गौतमचाच  चित्रपट , गौरीने फक्त गोंधळाचे अनेक रंग दाखवलेत – अंगद म्हसकर ( अर्णव ) खरं सांगायच तर फार प्रौढ वाटतो- खरं तर कोणीही अगदी तारुण्याच्या पहिल्या भरात नाहीये – तशी अपेक्षाही नसावी या पात्रांकडून .

स्वप्नीलने ( त्याचे काही irritating हसण्याचे shots वगळता ) चांगला अभिनय केलाय . कुटुंबातल्या इतर सदस्यांनी त्यांचे इवलुइवलुसे roles चांगले निभावलेत . पहिल्या भागातले बरेचसे धागेदोरे जुळवण्यात दिग्दर्शक यशस्वी झालाय – जे नाही जुळले ते थापा होत्या म्हणून सोडून दिलय .पण तेही पचत आपल्याला !

माझ्यापुरत सांगायचा झाला तर मला हा चित्रपट आवडला – मी त्याला माझ्या ब श्रेणीत टाकलाय ( म्हणजे बघताना छान वाटले पण परत पहावासा वाटत नाही , पहिला भाग मात्र अ श्रेणीत !  ) आणि एक दुसरा खास निकष – चित्रपट पाहताना रडू आलं तर तो मनाला भिडला ! ( साधारणपणे अर्धा लिटर अश्रू ढाळले मी ! )


शेवटी तो सतीश राजवाडेचा चित्रपट आहे ( आणि तोही पार्लेकर ! ) त्यामुळे त्याला पास होण्यासाठी कमी मार्कांची गरज असणार ! 

Sunday, November 15, 2015

रंग शांततेचा , निळाईचा ......

नवरात्र कधीच संपली...नऊ रंगाची नवरात्र....

अनेक रंग आपल्याही मनात डोकावत राहतात .....आपल्याला घेरतात ......कधी सकारात्मक तर कधी नकारात्मक ......

त्यातील एक रंग....आजचा रंग.....शांततेचा .....निळा......

रात्र बरीच झालीये....सर्वत्र सामसूम.....फक्त पंख्याचा ताल....आपल्याच मस्तीत , आपल्याच गाण्याचा ठेका धरतोय....ह्या तालावर बसणार एक गाण मी हलकेच गुणगुणते....गाणं संपता तोवर हा पंख्याचा ताल माझ्यात भिनून जातो....आजूबाजूच्या शांततेत वेगळा जाणवेनासा होतो......

मधेच AC खडबडून जागा होतो.....होऊ दे ! ....जागा होतो तसाच परत शांतही होतो....गुपचूप आपलं काम करत राहतो.....खोलीभर सुखद गारवा.......

शांतता मला आकाशी -निळी भासते .....मनात एक चित्र ....विस्तीर्ण पसरलेला माळ....सोनेरी ऊन आणि निरभ्र , निळे आकाश......फक्त वाऱ्याचा आवाज ......आकाशाची निळाई आणि शांतता .....चोहोबाजूंनी वेढून घेणारी !

डोळे मिटावेत.....शांत बसावं....हळू हळू ही शांतता आपल्यात भिनू द्यावी....मग हलकेच ऐकू येऊ लागतं...शांततेचं संगीत .....जणू निळी बासरी....मनाच्या कानाने ऐका .....निळी शांतता सांगतेय.....मी आहे....इथेच ....तुझ्यासोबत , कायम.....

कधी ह्या संगीताची परिणती हर्षाने होते.....कधी डोळ्यातून एखादा अश्रू टपकतो.....निळाच....कधी ह्या अलवार , तलम शांततेच्या लाटेवर स्वार होऊन एखादी कविता येते , कधी ललित स्फुट .....

ह्यालाच ध्यान म्हणतात का ?

कधी ही शांतता मनाच्या गाभ्यापर्यंत पोहोचतच नाही......मनात एक खदखदणार रसायन उकळत असत.....ह्या निळाईला गिळू पाहत......मग ह्या उसळणाऱ्या विचारांतून एखादा धागा पकडते आणि लिहू लागते.....हळू हळू रसायनसुद्धा निळच होऊन जातं......उरते एक तृप्त शांतता.....

आयुष्य आणि कविता .....
अलगद उलगडावं....
एक एक धागा....
नाजूक, रेशीम...
गाठ न पडता....
हळूच सोडवावा....
तलम वस्त्र...निळेशार
जणू मखमली मोरपीस ....
अलवार विणावे....
आणि करावा
नाजूक कशिदा ...
सोनेरी .....




Thursday, November 12, 2015

जुन्यामाजी थोडे नवे !

जुनी गाणी मला खूप आवडतात- पण ती ऐकायला जास्त ! Youtube आल्यापासून आता कोणतेही गाणे बघणे सहज शक्य झालय . काही काही गाणी अगदी जुन्या काळात घेऊन जातात - त्या श्वेत शामल काळात - जेव्हा नायिकेच रूप खुलून दिसायच-कदाचित त्याच कारण आपल्याला त्यांच्या चेहऱ्यावरचा makeup जाणवत नसेल म्हणूनही....

असो...

आज जुन्या गाण्यात रमणार नाहीये....आज काही नव्या गाण्यांबद्दल....

काही काही नवी गाणी अगदी अद्भुत वाटतात मला - विशेषतः रेहमान , शंकर-एहसान -लॉय यांची - आणि चित्रीकरण म्हणाल तर संजय लीला भन्साळीची !

हल्लीच त्याच्या बाजीराव मस्तानी मधील ' दीवानी मस्तानी ' पाहण्याचा योग आला -  ( खरं तर इतक्या मुबलक प्रमाणात इंटरनेटवर जे उपलब्ध आहे त्याला काय योग वगैरे म्हणणार ? ) पण छान चित्रीकरण - भव्य  , सुरेख सेट  - भन्साळीच्या इतमामाला  शोभेलसा - लाखमोलाची दिसणारी दीपिका -  मस्तानी म्हणून ती कशी दिसेल हे पूर्ण सिनेमा पाहिल्यावरच कळेल  .....पण या गाण्यात खूप सुंदर ! रणबीर सिंघही बाजीराव म्हणून चांगला दिसतो - ( फक्त एक mature आणि लढवैया राजा म्हणून अगदी किंचित कमी वाटला - कारण त्याच स्मितहास्य - जे अगदी हळू फुलणारंकिंवा अस्फुट हव होतं....हे आपल माझं मत - पेशवे आपल्या खऱ्या  भावना चारचौघात काय तर कधीकधी स्वतःलाही कळून देत नसावेत ! )

गाण्याला एकाच कडव आहे - मध्ये मध्ये filler music चे बरेच तुकडे - जे ही कानाला गोड वाटतात - खूप छान orchestration - खरं तर  चाल  किंवा शब्द उत्कृष्ट नाहीत - पण परिणामकारक नक्कीच आहेत - विशेषतः श्रेया गोशालचा आवाज ! फार सुरेख ! आता मस्तानी या प्रकारचे कपडे घालून , अस तंतुवाद्य घेऊन , अस नृत्य करत असेल हे माझ्या मनाला थोडा खटकल - पण थोडच !

यानंतर लगेच ' नगाडा संग ढोल " आठवतं - कारण तीच team आहे - खरं तर गाण्याची चाल आणि शब्द फारसे आवडले नाहीत - पण पुन्हा श्रेयाचा आवाज - तीक्ष्ण सुरीसारखा धारदार  ! ढोलकीच्या ( ? ) beats ने ते गाणं खूप energetic झालय - मला सर्वात काय आवडत असेल तर ह्या गाण्यात असलेली रंगांची कल्पक योजना ! दीपिका नेहमीप्रमाणेच सुंदर दिसते आणि नाचतेही - तिचे आणि सर्व dancers चे well-synchronised costumes  - लक्षवेधी लाल रंग ...दीपिकाचे नैसर्गिक wavy मोकळे केस आणि त्यांचा नृत्यातला कल्पक वापर ह्या गाण्याची ऊर्जा अधिकच वाढवतात .

ह्या रंगांपुढे कधीतरी आपली जुनी गाणी फिकी वाटतात ...पण क्षणभरच ! कारण ही रंगाची उधळण कालानुरूप फिकी पडते पण मुळची फिकी असलेली गाणी मात्र अधिकाधिक गहिरी होत जातात !

जाताजाता -

धूम ३ मधल " मलंग " हे गाणं पहिल्यांदाच नीट ऐकलं - कारण ते शंकर महादेवनच्या मोठ्या मुलाने  - सिद्धार्थने गायल आहे  - शब्द फार छान आहेत !  ' मलंग ' शब्दालाही अर्थ आहे - पहिल्यांदाच कळल ! पण त्याबद्दल पुन्हा कधी तरी !


आठवणी- ४

Anatomy चे इतर भाग मला फार आवडायचे - त्यात embryology आणि genetics होते. या विषयांची आमची अभारतीय पुस्तकही फार छान होती.डॉ. अय्यर embryology शिकवत असाव्यात - अस अंधुकस आठवतंय- खूप छान शिकवायच्या आणि होत्याही खूप छान - अगदी हसतमुख . डॉ .क्रिष्णा genetics शिकवायचे-त्यांचे ( south इंडिअन) उच्चार पटकन समजायचे नाहीत.एकदा त्यांच्या पिरियडला मी पहिल्या बेंचवर बसून झोपा काढत होते म्हणून मला ओरडले होते ! ( एकंदरीत झोपेच दुखणं फार जुनं ! )



 पहिल्या वर्षीचा तिसरा विषय म्हणजे Biochemistry ! माझा अत्यंत नावडता विषय !! तेव्हा जर मला कळल असतं की हाच विषय माझा उपजीविकेच साधन होणार आहे तर मी त्याकडे अधिक लक्ष दिल असत  !! ( म्हणजे आत्याबाईला मिशा असत्या तर....बोलण्या सारखच आहे ! )खरं तर इतका रटाळ विषय नाही दुसरा medicine मध्ये ! मला कधी तो समजलाच नाही . फार थोडे शिक्षक आठवतायत- तेही फारसे inspiring नव्हते. परीक्षेतही दांडी गुल होता होता राहिली. माझ त्या paper ला घड्याळ बंद पडलं- शेवटी कसबसं - अगदी खराब अक्षर काढत- तो paper पूर्ण केला. हं- तसा अभ्यासही झाला नव्हता - कारण उद्या शेवटचा paper या विचाराने मला आनंदाच्या इतक्या उकळ्या फुटत होत्या की मी मन एकाग्र करूच शकत नव्हते . त्यात गरब्याचे दिवस ! त्यावेळी आमच्या सोसायटीत खूप मोठ्या प्रमाणावर दांडिया व्हायचा - त्यामुळे प्रचंड आवाजही मला ( अभ्यास न करण्यासाठी ) मदत करत होता !

बाकीचे papers , परीक्षा काही केल्या आठवत नाही- practicals ही नाहीत.Term exams च्या आधी धडधडण आठवतंय आणि संपल्यावर - फक्त परीक्षा संपल्याचा आनंद आठवतोय ! सर्व परीक्षा मी पास तर झाले पण कधी चमकले नाही. शाळेत  'आपण हुशार आहोत  ' अस वाटण ,  कधी  'आपण अगदी ढ आहोत '  यात बदललं कळलही नाही - इंग्लिश बोलण्याबद्दलचा न्यूनगंडही होताच .

MBBS मध्ये गेल्यावर पहिल्यांदा train चा प्रवास सुरु झाला. त्या आधी मी ठाण्यातच शिकत होते. आईने मला ट्रेन प्रवासाच्या आधी खूप instrutions दिलेली आठवतात - आपली नेहमीचीच - पिढ्यानपिढ्या आया देत आल्यात तशीच ! ठाणे ते सायन मस्त झोप काढायचे - ( माझ्या गोष्टीत झोप वारंवार येते - जशी मला येते तशीच ! )   पहिल्या दिवसापासून माधुरी आणि मिताली माझ्याबरोबर असायच्या. मग पुढे पुढे आमचा central रेल्वे वाल्यांचा मोठठा ग्रुपच झाला . हळू हळू सर्वांची ओळख झाली आणि आमची batch किती छान , साधी, सरळ आहे हे कळल .

आणखी काही ठळक आठवणी पहिल्या वर्षीच्या -

Social - हे नावच मी इथे येऊन ऐकलं . उत्सुकता होती काय असत त्याची. त्यासाठी रात्री यावं लागणार होतं . हे पहिल social आमच्या senior batch ने आमच्या साठी दिल होतं . सर्वच socials अगदी २-३ वाजेपर्यंत चालायची . त्यानंतर पहाटेच्या पहिल्या ट्रेनची वेळ होईपर्यंत इथे तिथे वेळ काढायचा. ( जेव्हा मी hostel मध्ये राहत नव्हते तेव्हाची गोष्ट ) पहिल्या socialमध्ये मी वर्गात धड कोणालाही ओळखत नव्हते - ते college सुरु झाल्यावर लगेच झाल होतं -  पण तरीही मजा आली होती - एक नवा अनुभव होता - रात्रभर नाचण्याचा - ( पुढे दोन दिवस पाय दुखत होते खूप ) काही games , dinner - पण एकंदरीत ओळख करून घेण्यासाठी - social interaction वाढवण्यासाठी म्हणून ते social ( असावं ) मराठी शाळेतून आलेल्या मला थोडा cultural shock असला तरी या पुढची , फक्त आमच्या वर्गाची socials मी खूप enjoy केली.

LTMMC Day साठी झालेली माझी audition - माझ्या मते मी चांगली गायले होते , पण तरीही माझी निवड  झाली नव्हती. माझी जवळची मैत्रीण मितालीची निवड  झाली -  त्यासाठी थोडा आनंद आणि थोडी असूया वाटलेली आठवते ! ( मी " ओ सजना " म्हटल होतं . )


पहिला college फेस्टिवल ज्यातलं फार काहीच आठवत नाही , फक्त एक दिवस थांबून  " तेजाब " सिनेमा पहिला होता. तसाच पहिल monsoon  melodies - पण त्यात मी बहुदा गायले नव्हते .

 पहिला वहिला College day - ज्यात आम्हाला आमच्या seniors ने जे सांगितलं तेच गाणं म्हणायच अशी सक्ती होती. मी , मिताली , आणि उमा - आम्ही तिघींनी " गजर ने किया है इशारा ' हे गाणं - तेही बाळबोध ,  साड्या बिड्या नेसून म्हटल !  गाणं बर झाल  खरं , पण मला ते कधीच फारस आवडलं नाही . ( ही वेशभूषाही seniors चीच idea होती का ? )

Guardian Teacher - ही नवी संकल्पना त्यावर्षी सुरु झाली होती आमच्या college मध्ये ( medical college मधल्या मुलांना फार दडपण येतं - मग त्यांना , त्यांच्या समस्यांबद्दल  बोलण्यासाठी , प्रत्येक batch ला एक शिक्षक नेमले होते . आमच्यासाठी होत्या डॉ. पंतवैद्य - ( त्या  Anesthesiology च्या professor होत्या ) . आमच्यापैकी कोणीच त्यांच्याकडे कसल्याही समस्या घेउन गेलं नाही ! पण त्यांनी आम्हाला गुरुकृपा मध्ये पाणीपुरी आणि मग  Black Current icecream  खायला ( कुठे ते आठवत नाही ) नेल. माझ्यापुरत बोलायचं तर मी हे दोन्ही प्रकार पहिल्यांदाच खाल्ले .  पण त्यानंतर आजतागायत मागे वळून पाहिल नाहीये ! त्यामुळे आजच्या  माझ्या स्वरूपाचं श्रेय त्यांना द्यायला हरकत नाही !  जाता येतं आम्ही चालत जायचो - सायन हॉस्पिटलच्या मागच्या गेटमधून आत जायचो - जाता येता खादाडी करायचो !

पहिल्या वर्षीच्या परीक्षेचं सेन्टर वडाळ्याला होता ( कॉलेजच नाव काय बर होत ? ) येताना आई न्यायला यायची - प्रचंड गर्दी गाडीत - कारण ती ऐन गर्दीची वेळ  - जीव मुठीत धरून चढायचो . practicals मुळीच आठवत नाहीत. ही कहाणी ऑगस्ट ९० -डिसेंबर ९१ पर्यंतची .


अशा रीतीने पहिल्या वर्षीची कहाणी सुफळ संपूर्ण जहाली !




आठवणी-३

पहिल्या वर्षीचा दुसरा विषय म्हणजे Anatomy.

Anatomy मध्ये अनेक भाग होते- त्यातला एक भाग म्हणजे dissection . खरं म्हणजे तो एक  प्रचंड धक्काच असतो आपल्या senses ना ! ती अंधारी dissection room , तिथे पसरलेला तो विचित्र वास ,( जो फोर्मालीन चा  होता )आणि विविध आकार आणि रंगांचे मृतदेह. पहिले काही दिवस कोणालाही जेवणच जायच नाही - कितीही धुतले तरी हातांचा तो वास ….दरवळत राहायचा ! माझं पहिल dissection हे lower /inferior extremity  ( Infex )अर्थात  पायाचं होतं.माझ्या वाट्याला एक अतिशय लठ्ठ बाई आली होती- जिच्या अंगावर एवढी चरबी होती की त्यातून एखादी nerve किंवा blood vessel शोधण फार म्हणजे फारच कठीण काम !  त्यातून आत्तापर्यंत  सर्व काही “ शिकवले  तरच समजते “ही पक्की खात्री ! त्यामुळे कोणी शिकवणार नाही म्हणजे अतिशय हेल्पलेस वाटायच ! स्व अभ्यास ही संकल्पना डोक्यातही आली नव्हती. dissection हा प्रकार ( Cunningham नावाचा खरं तर खूप चांगल पण त्यावेळी फ्रेंच-ग्रीक  वाटणारं ) textbook वाचूनच करायचा ही teachers ची पक्की समजूत झाली होती..

शिक्षकही थोडे दिव्य होते- अगम्य उच्चार , दुर्बोध शिकवणं, अचाट इंग्रजी आणि तोंडात सतत सिगारेट ! Infex मला कधीही नीट समजलं नाही ! पुढे पुढे मात्र  “ चौरसिया” नावाच आपल्या मातीतल पुस्तक मिळाल ( जे अक्षरशः एखाद्या गाईड प्रमाणे होतं ) आणि पास होण्यापुरत anatomy यायला लागलं ! सर्वच विषयांची भारतीय पुस्तक मिळाल्याने आम्हा students ची थोडीफार सोय झाली !

superior extremity ( supex) म्हणजेच हात - या dissection ला मात्र चांगले शिक्षक मिळाले, कोणीतरी surgeon होते- नाव आठवत नाही आता-पण आपल्यालाही समजू शकतं असा वाटायला लागलं.thorax ( chest) ला डॉ. शेजवलकर होत्या -त्या lectures मध्ये Genetics शिकवायच्या.- त्यांचाही शिकवणं समाजत असे मला…..थोड्या कापऱ्या- रडक्या आवाजात गाणं म्हणणाऱ्या ( पण त्या सुरात गायच्या एवढा नक्की ! ) -त्यांनी मला एकदा dissection नंतर गाणं म्हणायला लावलेला आठवतंय .( तेव्हा मला गायचा अजिबात confidence नव्हता-मी चांगली गाते असा मला मुळीच वाटायच नाही ! ) त्या स्वतःही एका LTMMC Day ला गायल्या होत्या - ( जिया ले गयो जी मोरा)

पहिल्या भागाला आलेल्या अगम्य शिक्षकांनी मला बराचसा dissection शिकवल( किंवा नाही शिकवलं ! ) त्यामुळेच हा BMR ( basic में राडा ) नावाचा रोग माझ्या वाट्याला आला अशी माझी पक्की खात्री आहे ! ( आता बोलायला काय जातंय ! )

Anatomy साठी आम्हाला Bone set अर्थात हाडांचा सापळा घ्यावा लागे.-तो एक स्वतंत्र अभ्यासच होता- ती हाड शरीरात कशी असतात त्याप्रमाणे धरून दाखवा -अर्थात anatomical position हा प्रत्येक viva मध्ये ठरलेला प्रश्न - ज्याच उत्तर प्रत्येक विद्यार्थी वेगळ द्यायचा ( अर्थात ह्यातही हुशार मुलांच exception होतच ) माणसामाणसामधील वैविध्याचा तो आम्ही घेतलेला मागोवा होता ! ( आमच्या परीने ! ) ट्रेन मध्ये , गर्दीत,ती हाडं हळूच काढून आम्ही अभ्यास करण्याचा नाटक करत इतर प्रवाशांना घाबरवलेल आहे !

Train वरून आठवलं- ट्रेन सुरु झाली की मी नेहमी गाढ झोपून जायचे-आणि उरलेली झोप वर्गात पूर्ण करायचे ! अगदी थोडी हवा जरी लागली तरी डोळे मिटण्याची ती सवय अजूनही कायम आहे !


आठवणी २

1st MBBS मध्ये रेश्माच्या बाबांनी आमचा संसार थाटायला मदत केली.ती माझी पहिली ( आणि शेवटचीही )रूममेट .आमच्या खोल्या खरं तर अतिशय भयाण होत्या.toilet बाथरूममध्ये कबुतरं फडफडत असायची.घाण करायची.छपर गळायच पावसाळ्यात , तुटक्या खिडक्यातून आत येणारी धुळच धूळ! सोबतीला उंदीर! छपरसुद्धा बाबा आदमच्या जमान्यातली ! काही केल्या पंख्याचा वारा काही लागायचा नाही.छतावरच्या सळ्यावरून धावणाऱ्या उंदरांची खुडबुड रात्री अपरात्री जाग आणायची.कसे राहायचो आम्ही तिथे देवालाच ठाउक  ?

दर बुधवारी आणि शनिवारी मी घरी पळायचे-धुवायच्या कपड्यांचा ढीग घेऊन ! मला खूप होमसिक वाटायच .तसा रोज दुपारी घरून डबा यायचा..ज्यात आईच्या छोट्या छोट्या चिट्ठया असायच्या...मी बरीच वर्ष त्या सांभाळून ठेवल्या होत्या.परत येताना तसेच धुतलेले कपडे bag मध्ये टाकून यायचे- दाराबाहेरच एक इस्त्रीवाला  उर्फ Ironman होता ( तो लक्षात राहण्याचा कारण म्हणजे एका Hostel Nite नंतर तो “ आपका neck बहुत अच्छा है “ असा म्हणाला - खूप हसू आलेल मला- माझ्या गात्या गळ्याऐवजी त्याने माझ्या मानेला compliment दिली ! )
१ st MBBS ला दाभोलकर “गुरुजी” होते ...गुरुजी म्हणायचं कारण - त्यांच्या period ला roll number प्रमाणे बसावे लागे….college मधून पुन्हा शाळेत आलो असा वाटायला लागलं मला तेव्हा !पहिल्याच दिवशी stage वर जाऊन स्वतःचा नाव ( आणि काय ? college ? मार्क ? ) माईक वरून सांगावं लागलं. दाभोळकर सर उर्फ Dobby ( आता त्यांना Dobby म्हणायला कसतरीच वाटत !)सर्वांना नावाने ओळखायचे . ८ वाजता  sharp ,lecture hall ची  दार  बंद व्हायची आणि उशिरा येणारे सरळ  गैरहजर ठरायचे.आता वाटत की ही शिस्त जरुरी होती...शेवटी आम्ही डॉक्टर होणार होतो..बेशिस्त वागून कसे चालणार होते ?

त्यांचा period ला मला मात्र कायम झोपच यायची ( अजूनही कुठल्याही lecture ला १० मिनिटांच्या वर डोळे उघडे राहत नाहीत माझे !) ते खरं तर न शिकवता direct dictate करायचे. त्यांच्या notes बहुतेक चांगल्या असतीलही पण मी कायम textbook च ( Guyton )वापरले. मधेच प्रश्नही विचारायचे ते- मलाही एकदा जांभया देताना प्रश्न विचारून खाड्कन जाग केलय त्यांनी ! ( पण उत्तर मात्र देऊ शकले नव्हते मी ) ... 1 st MBBS म्हटल की गुरुवर्य दाभोळकरच आठवतात आधी .

त्यांच्या lecture ला उशीर होऊ नये म्हणून आम्ही 7:05 ची ठाणा local पकडायला धडपडायचो.( हे hostel मिळायच्या आधी ) एकदा तर मी धावती local पकडली होती…( त्याच local मध्ये Anatomy चा एक नवा lecturer (? Dr दळवी) होता...आणि “ ही काय विचित्र मुलगी ?” अशा नजरेने माझ्याकडे बघत असल्याचा अंधुकस आठवतंय. त्यांच्या विषयाच्या दर आठवड्याला tests व्हायच्या आणि कमी मार्क मिळाले की शिक्षा ! ( म्हणजे group tutorials) तशा फारशा आठवणी नाहीत त्यांच्या period बद्दल ( फक्त एका मुलीला  त्यांच्या period मध्ये उलटीचा त्रास झाला होता आणि त्यामुळे बंद दार काही वेळासाठी उघडली होती ) फक्त एक impression मात्र आहे- शांत , धीरगंभीर आवाजात बोलणारे सर…एकंदरीत physio हा शाळेचाच एक भाग आहे अशी माझी खात्री झाली होती.

पुढे पुढे मला physiology फार आवडायला लागलं.विशेषतः डॉ मालती शिकवायला लागल्यावर तर अधिकच ..अजूनही एक south Indian शिक्षिका होत्या ( नाव विसरले ) ज्या G.I.T. physiology शिकवायच्या..त्याही खूप छान होत्या.

त्या वर्षी Guyton चा “ धोंडा “ घेऊन मी गोव्याला गेले होते...परीक्षा होती मे च्या सुटीनंतर -पण अभ्यास काहीच केला नाही-जो केला तो समजला नाही-आणि जो समजला तो लक्षात राहिला नाही..थोडक्यात काय तर मजेच्या वेळी उगाच अभ्यासाचा आव आणू नये ! काहीही फायदा होत नसतो !

आठवणी- १

2५ एक  वर्ष झाली असतील मला , diary लिहायला सुरुवात करून. आधी तर बरीचशी पाने कोरी  असायची-दर वर्षी १ जानेवारीला उत्साहाने सुरवात आणि मग हळू हळू ढेपाळत जायचे .नोंदीसुद्धा अगदी विनोदी “ सकाळी उठले. दुध प्यायले.करमचंद पहिले- छान होते “वगैरे वगैरे.कधीतरी शाळेतली भांडणं सुद्धा “ नीलमला ओरबाडले.मग वाईट वाटले.रडले" अशा हास्यास्पद गोष्टी !कधी मिळालेले मार्क, कधीतरी बघितलेले सिनेमे आणि serials. अगदी बारावी होईपर्यंत माझ्या नोंदी तुटक तुटक असायच्या.

मग पुढे MBBS ला प्रवेश मिळाला.- ती पाच वर्ष मी काहीच लिहिलं नाही.खरं तर ते दिवस अत्यंत सुंदर होते - पहिल्यांदाच stage वर  गायला लागले ,फार छान मित्र मैत्रिणी मिळाले , थोडा फार ड्रेस सेन्स  सुधारला(-मैत्रीणीमुळे अर्थातच ! ) आणि हळू हळू- वर्षभराने का होईना -काय शिकवतात ते कळायला लागले. मी चक्क doctor झाले !!

इंटर्नशिप चा काळ अजूनच मजेदार - आम्हाला त्या Dr. Reddy नी फसवलेच ! ( Reddy च होत न त्यांच नाव ?) एकाच batch मध्ये ठेवतो म्हणून आमच्यातल्या अर्ध्या जणांना वेगळ केलं. तरीही खूप मज्जा केली आम्ही सर्वांनी ! २-३ trips झाल्या- बरेच movies झाले -एक  strike सुद्धा झाला मुलुंड ला असताना  !

१ ल्या वर्षीच्या आठवणी - किमान पहिल्या सहा महिन्यांच्या तरी - फारशा रंजक नाहीत. तेव्हा अभ्यास समजत नव्हता , राहायला जुन्या होस्टेलच्या barracks होत्या. ठाण्याच्या आम्ही ४ मुली - मी -रेश्मा आणि माधुरी-मिताली.माधुरीशी माझी ओळख झाली ती मी sion हॉस्पिटल ला फी भरायला आले तेव्हा -मी तशी कोणाशीही आपणहून बोलायला जाणार्यांपैकी नव्हते- माधुरी मात्र स्वत:हून ओळख करून घ्यायला आली.

थोड जास्तच  पुढे गेले मी- त्याआधी interviews बद्दल -तो दिवस  बऱ्यापैकी आठवतोय. नायर हॉस्पिटलच्या auditorium  मध्ये आमचे interviews होते  -अपर्णा बुधुगुरू ( सर्व उकारांच नाव !) जी त्या दिवशीची पहिली candidateहोती - ती येऊन आपल्या आईला म्हणाली ( थोड्या  निराशेतच )” सायन मिळाल “PCB मध्ये ९५ च्या वर मार्क असलेल्या मुलांची अपेक्षा होती की  आपल्याला G.S. मेडिकल मिळाव - ते अगदी top choice  होतं. मी मात्र आपल्याला admission मिळाल्याच्या खुशीत होते.

आणि अशा रीतीने मी sion ला गेले! माधुरी मिताली शी ओळख झाली  and we became very close friends  for next 5 years. Off course ,now, for many years I haven’t been in touch with them. But with whatsapp we have reconnected.

.....आणि अशा या आठवणीना उजाळा देण्यास निमित्त म्हणजे एक जुनी diary सापडली मला -एका पावसाळी दुपारी...काहीही उद्योग नव्हता तेव्हा खरडलेली ही काही पाने-पुन्हा पुन्हा वाचायलाही खूप मजा येतेय !

भेटूच पुन्हा !


असंच काहीसं...उगीच...लिखाण

खूप दिवसांपासून मी ब्लॉगवर काहीच लिहिलं नाहीये , हा विचार मनाला बराच त्रास देत होता . हा ब्लॉग सुरु करताना माझा मुख्य हेतू मी वाचलेल्या पुस्तकांबद्दल लिहिणे हा होता , जेणेकरून माझ वाचन सर्वंकष आणि शिस्तबद्ध होईल . मग हळूहळू इतर विषयही हाताळू शकेन अस वाटलं  म्हणून ते Certain other things !


कोण म्हणता लिखाण नेहमी profound हव …..कधीतरी ते मनाचा फेरफटका अशा स्वरुपातीलही असू शकतच की  !  ती गुळगुळीत , रंगीत पानांची इंग्रजी मासिके पहा - खरं तर त्यातील जाहिरातीच अधिक माहिती देणाऱ्या असतात …. बाकी असच ….ramblings !


मला अस नेहमीच वाटत , की , लिहिण्यासाठी , या सिद्धहस्त लेखकांना इतके नवनवीन विषय कुठून मिळतात …..माझं या प्रश्नापाशी येऊन  , घोडं अडतं , नेहमीच….


आता  , मला सर्व प्रश्नांची उत्तरं पुस्तकांत शोधायची सवय ! मग मी लिखाणावर मार्गदर्शक अशी पुस्तकं शोधू लागले …..सुदैवाने ती माझ्या कपाटातच होती…( म्हणजे मी नेहमीप्रमाणे विकत घेऊन ठेवली होती आणि साफ विसरून गेले होते ! )


‘ Writing down bones within  ‘ - Natalie Goldberg  हे ते पुस्तक...जे मी आजच वाचायला  घेतलंय…...त्या अनुषंगाने मनात आलेले काही मुक्तछन्दातले विचार …..( पण गद्यच !  )


सारखे Dazzling , brilliant , विषय काही मिळणार नाहीत….पण हरकत नाही...कुठचाही विषय घेऊन लिहायला सुरुवात केली पाहिजे….पण थोडक्यात...फाफटपसारा वाचायला वेळ कोणाला आहे हल्ली ? मात्र लिखाण interesting , flowing and  थोडंफार humorous  असेल तर मस्त  !


प्रत्येकाच्या लिखाणात  स्वतःचा  थोडाफार तरी अंश असतो - त्यामुळे  आपलं अनुभव विश्व समृद्ध हव - त्यासाठी चांगल ऐकणं , वाचण आणि पाहणं , तसच नवनवीन लोकांना भेटणंही अत्यंत महत्वाचं .


लिहिण्यासाठी बाहेर आणि ( मनाच्या ) आत शांतता हवी…..


वह्या कसल्या वापराव्यात ?  - तर चांगल्या , पण तरीही , साध्या - कारण खास ठेवणीतल्या वह्यावर फक्त खास , अगदी उत्तम लिखाण करावस वाटतं - त्यामुळे ते उमटत नसेल तर त्या कोऱ्याच राहतात !


सर्वात महत्वाचं आहे ते सातत्य - रोज किमान दहा मिनिटे तरी लिहिणे - आणि फक्त लिहिणे - मग कसलही editing , punctuation , grammar , spelling काहीही बघायचं नाही….हे लिखाण फक्त आपल्या अंतर्मनातील सृजनशीलतेला जागवण्यासाठी - हे काही आपण कोणाला दाखवायची गरज नाही ...हो...यातून कधीतरी काही उत्तम idea मिळून जाईलही !  ह्याला म्हणतात Timed writing … ( हे लेखन त्यातूनच आलय ! )


हीच concept मागे Julia Cameron नावाच्या लेखिकेच्या पुस्तकातही वाचली होती….मोर्निंग  pages  या नावाने...म्हणजे सकाळी उठून , इतर काहीही करायच्या आधी , लिहित सुटणे...तीन पूर्ण पान भरेपर्यंत !


आज एवढच वाचलंय आणि अमलातही आणायचा प्रयत्न करतेय ! तसा हे abstract लिखाण झाल...त्यामुळे हे publish करण्याजोग आहे का माहित नाही ! पण असं कुठे म्हटलंय कि फक्त रेखीव , कोरीव आणि कातीव लिखाण प्रसिद्ध कराव ? त्यामुळेच…..

चालत राहा…...

चालायला तर लाग तू ….

वाट सापडेलच हळूहळू -

उजेडही होईल …...

जरी आता अंधार असला तरी ,

  • कारण सूर्य या अंधाराच्या पलीकडेच आहे …..

वाट बघत थांबलाय  ,  

तुझी -

घाबरलीस ?

ही तर झाडं आहेत …..

राक्षस नाहीत ,

सावल्या आहेत …..

ज्या सोबतच करतात….. उजेडी …..

- आणि थोड चाललीस ,

तर जंगल संपेल -

मग -

फुलांच शेत ,

पहाट वाऱ्यावर  डोलणारी फुलं …..

तुलाही वाटेल -

नाचावं …..

या फुलांसोबत …..

कारण ….पहाट झालीये ……

आणि हो ,

इथेच बसून राहिलीस ,

तर पहाट  होईल आपल्या वेळी …..

पण तुझ्यापर्यंत पोचणार नाही ……

चाललीस तर ……

रंग , गंध , स्पर्श , उजेड …..

थोडक्यात ….स्वर्ग ……

फक्त चार पावलांवर …….

उठ …..

चल……

थांबू नकोस …..

वळू नकोस ……

पावलापुढे पाउल ……

टाकत राहा ……..

चालत राहा……

चालत राहा…...

अमूर्त

आपलं नातं ......जगावेगळ .....शब्दापलीकडल.....

मी न मागण्याच ......

आणि तरीही तू  देण्याच .......

कधी एकांतात , निशब्द .....शांतता ऐकू येते .....

मला माहितीये .....ती तुझीच चाहूल असते .....

कधी वाऱ्याची  झुळूक स्पर्शून जाते ......

तीही तुझीच आश्वासक मिठी ......

काही लिहिते कधी .....जणू तुझ्याशीच बोलते .....

आणि तुझी उत्तरे .....

सापडतात मला ठायी ठायी ....

कधी एखाद्या पुस्तकात -

तर कधी त्या मूर्ख ठोकळ्यांवरील एखाद्या संवादात -

गुळगुळीत पानांच्या निरर्थक लेखातील एखाद्याच समर्पक वाक्यात -

प्रश्नाच्या आधी उत्तर ....असही होत कधी .......

पण तरीही , साशंक  , वेड मन .....

तुला ऐकू जात नाहीये - अशा विचाराने कासावीस होतं.....

धाय मोकलु लागत.....

मग कळत...इथेच आहेस तू .....माझ्या भोवती ......

पण माझ्या मनाची कवाडं बंद झालीत ......या अनाठायी भीतीपोटी.....

पुन्हा दीर्घ श्वास घेऊन....डोळे मिटून .....

आणि मनाची दारं उघडून ....

तुला शोधते ......

आणि तू खरच तिथेच असतोस , भेटतोस.....

कायमच ......